top of page
Yoga

Exercise (व्यायाम)

​व्यायाम व मानसिक आरोग्य यांमधला नेमका संबंध काय? व्यायाम कसा असावा, कसा करावा यासंबंधींची उत्तरे देणारा हा ब्लॉग.

#mentalhealth, #psychology, #exercise, 

#psychiatry, 

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn
  • Instagram

"डॉक्टर, आम्ही तर शेतात दिवसभर काम करतो, वेगळा व्यायाम कशाला पाहिजे"? 

"माझ्या घरातल्या घरात शेकडो फेर्या होतात, किचन ते हॉल मध्ये. अजून कशाला वेगळं चालायला पाहिजे"? 

असे प्रश्न बहुतेक क्लायंट्स, किंवा त्यांचे नातेवाईक विचारतात. बहुतेक प्रश्नांमागे, व्यायाम टाळणे हा हेतू नसतो, तर आपण मुळात व्यायाम करतच आहोत अशी एक गैरसमजूत असते. 

सर्वप्रथम व्यायाम का करायचा ते समजून घेऊ: 

व्यायाम का केवळ वजन कमी करणे, साईझ झीरो करणे, सिक्स पॅक बनवणे या हेतूसाठी नाहीच आहे. हे हेतू हे व्यायामामुळे मिळणारे बोनस आहेत. व्यायामाचा मूळ हेतू, शारिरीक व मानसिक हालचाल, लवचिकता व ताकद राखणे व वाढवणे यासाठी आहे. व्यायाम केल्याने, 

१) शरीराची हालचाल होत राहते, metabolic rate वाढतो, ज्याने सर्वांगीण फिटनेस राखायला मदत होते. 

२) शारिरीक कणखरपणा, वेग, चपळाई वाढते. स्थूलपणा कमी होतो. आळस कमी होतो. 

३) स्नायूची ताकद व गोलाई वाढते. शरीर सुडौल होते. 

४) ह्रदयाची मूळची गती कमी होते, ज्यामुळे ह्दयाचा फिटनेस सुधारतो. 

हे झाले शारिरीक फायदे: मानसिक फायदे म्हणजे: 

१) शरीराला व मनाला एक ठराविक वेळेचं बंधन येतं, शिस्त लागते. वेळेचं नियोजन करायची सवय लागते. 

२) मूड (मानसिक स्थिती ) प्रसन्न होते. थकवा कमी होतो/जातो. 

३) झोपेच्या सौम्य समस्या सोडवण्यात मदत होऊ शकते. 

४) मानसिक ताण, चिडचिड कमी होते. 

५) नैसर्गिक endorphins शरीरात स्रवतात, ज्यामुळे मन नैसर्गिक रित्या प्रसन्न होते. 

६) मानसिक आजारांमध्ये औषधोपचारासोबत व्यायाम केल्यास, आजार बरा होण्याची गती वाढते. 

७) depression, anxiety, OCD, schizophrenia या मानसिक आजारांत शारिरीक हालचाल वाढवल्याने उपचारांना गती मिळते असे संशोधनात समोर आले आहे. 

हे सगळं सांगितल्यावर, अनेक रुग्ण/नातेवाईक, जे दिवसभर शारिरिक थकवा येणारी कामे करतात, (जसे शेती, वाहन चालवणे, अवजड यंत्र चालवणे, वजन उचलणे इ). त्यांना आश्चर्य वाटते, कारण, दिवसभर कठोर मेहनत करुन देखील, त्याना मानसिक आजार, स्थूलपणा, मधुमेह/रक्तदाबासारखे आजार होत असतातच! म्हणूनच वैतागून ते विचारतात, इतका व्यायाम करुन पण आम्हाला हे आजार झालेच ना! मग आता वेगळा व्यायाम कुठला? 

तर यातलं महत्वाचं तत्व हे की, कष्ट किंवा श्रम म्हणजे व्यायाम नव्हे. व्यायाम करताना शरीराला त्रास झाला तरी चालेल (नव्हे, तो व्हायलाच हवा), पण त्या वेळेस मन हे शांत, प्रसन्न किंवा ताणमुक्त असलं पाहिजे. एखादा माणूस जेव्हा त्याचं काम करत असतो, एखादा शेतकरी असेल, विक्रेता असेल, किंवा डॉक्टर असेल, त्यावेळेस त्याचं मन त्या कामाच्या जबाबदारीखाली असतं. त्याचं काम कितीही आवडतं असेल, पण तो ते मोकळ्या मनाने करत नसतो, तर एक अदृश्य वजन त्याच्यावर असतं. अनेक कामांमध्ये तर कामाचं वातावरण इतकं त्रासदायक असतं,(उदा: खूप उष्ण खाणीत काम करणारा एखादा कामगार, किंवा दिवसभर फिरती हातगाडी चालवणारा एखादा विक्रेता) की कामाची जबाबदारी आणि ते वातावरण यामुळे ते श्रम जरी शरिराला झाले, तरी मन शांत नसल्यामुळे त्याचे फायदे त्याला मिळूच शकत नाहीत.

त्यामुळे व्यायाम निवडताना/करताना खालील गोष्टींचं भान ठेवा;

१) शक्यतो व्यायामाला तुमच्या कामाशी जोडू नका. व्यायामासाठी वेगळा वेळ काढा. 

२) साधारणत: जो माणूस निरोगी आहे, किंवा व्यायाम करण्यात कोणताही धोका नाही, अशाने आठवड्यात साधारण १००-१५० मिनिटे व्यायाम करावा. 

३) यात ५०-७० टक्के cardio व्यायाम, जसे चालणे, धावणे, सायकल चालवणे, इ असावा, व राहिलेला relaxation, stretching असावा, जसे योग, प्राणायाम, किंवा अन्य. 

४) व्यायाम करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, केवळ वजन कमी करणे हे उद्दिष्ट न ठेवता, शरीराचा फिटनेस व चपळाई वाढवणे हे मुख्य ध्येय आहे हे लक्षात ठेवा. 

५) व्यायाम कोणत्याही वेळेस चालतो. शक्यतो सकाळी, किंवा संध्याकाळी उन नसल्याने ती वेळ जास्त सोयिस्कर ठरते. तरी प्रत्येकाने आपला दैनंदिन वेळापत्रक पाहून ती वेळ ठरवावी. 

६) अनेक मानसिक आजारांत, दररोज चालणे हा व्यायाम सर्वात सोपा, सुरक्षित व सोयिसकर ठरतो. उपचार सुरु झाल्यावर, किंवा डिसचार्ज घेताना, नातेवाईकांनी पहिले काही दिवस रुग्णासोबत स्वत: चालण्यास जावे कारण रुग्णाला पूर्ण बरा होईपर्यंत मदत/साथ लागू शकते.

७) व्यायाम करताना, वजन वाढवणे, किंवा कमी करणे यासाठी कोणतीही औषधे किंवा प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी तुमच्या psychiatrist सोबत, किंवा फॅमिली डॉक्टरांसोबत त्याची चर्चा करा.  

8) व्यायाम सुरु करताना, किंवा वाढवताना, पुरेसा पोषक आहार घ्या, व पाणी प्या. 

लक्षात ठेवा: निरोगी शरीर व मनाचा आयाम - नियमित व्यायाम!

Contact

Dhanvantari Nursing Home Neuropsychiatry Centre

331, E, Off Wilder Memorial Church. New Shahupuri.

Kolhapur. 416001. Maharashtra, India. 

Phone: +91-9167577279

bottom of page