top of page
Search

झोपेत लघवी होणे (Managing bedwetting in children): पालकांसाठी महत्वाची माहिती.

Writer: Devavrat HarsheDevavrat Harshe

Updated: Nov 22, 2023


"डॉक्टर, वैतागलोय आता आम्ही. किती सांगायचं त्याला. तुम्ही चांगलं counselling करा त्याचं आणि सांगा हे सगळं बंद करायला. १५ वर्षाचा झाला, शोभतं का हे या वयात? मला तर वाटतं, मुद्दाम करतो तो.” दहावीतल्या मुलासोबत आलेले ते पालक काहीसे चिडूनच बोलत होते. सुशिक्षित पालक, सुखवस्तू घर, चांगली नोकरी, अभ्यासात हुशार असणारा मुलगा, सगळं छान होतं. पण………….



त्यांचा १०वीत असणार्या मुलाला अजूनही बिछान्यात लघवी (bedwetting) होत होती (त्यांच्या शब्दात तो बिछान्यात लघवी करत होता). जवळपास दररोज, आणि विशेषत: पावसाळ्यात किंवा थंड हवेत हा प्रकार फारच वाढायचा.

सुरुवातीला “अजून लहान आहे, होईल कमी” म्हणून पालकांनी सोडून दिलं. नंतर मग “काही मुलांना लागतो उशीर, होईल हळूहळू” किंवा “तो नं जरा लेटंच आहे सगल्या बाबतीत” असा कौतुकमिश्रीत सल्ला घरातल्या वडीलधार्यांनी दिला. हळूहळू वाढत्या वयाबरोबर मात्र पालकांचा धीर आणि संयम सुटत चालला, आणि ज्याला सुरुवातीला “जरा लेटच आहे तो” असं कौतुकाने बोललं जायचं, त्याला “आळशी आहे”, “मुद्दाम करतो”, “वयाचं काही भानच नाही” अशी लेबल्स लावली जायला लागली. आई वडिलांना, विशेषत: आई ला मुलाकडे लक्ष देणं कसं गरजेचं आहे, नोकरी करून मूल वाढवणं हे कसं मुलाचं नुकसान करतं याचा उपदेश केला जाऊ लागला, ज्यामुळे पालकांचं मानसिक स्वास्थ्य आणि नातं बिघडायला लागलं.


सुरुवातीला एखादं ट्रेड सीक्रेट जपावं इतक्या गुप्ततेने त्या घराने ही बाब लपवली, अगदी जवळच्या नातेवाईकांपासून देखील. हळूहळू मात्र, “तो आमच्याकडे खेळायला का येत नाही आता”? “तुम्ही पहिल्यासारखे आमच्याकडे दिवाळीला ४ दिवस का येत नाही रहायला?” किंवा “काकू त्याला परवा शाळेच्या पिकनिक ला का नाही पाठवलं” अशा प्रश्नांना उत्तरं देणं पालकांना दिवसेंदिवस अवघड जायला लागलं.

याचा परिणाम असा झाला, की यातून येणारं फ्रस्ट्रेशन पालक त्या मुलावर काढायला लागले. येता जाता त्याला लेक्चर देणे, प्रसंगी त्याला असणार्या समस्येची थट्टा करणे, हे सुरु झालं. पुढे पुढे तर, छोट्या भावासमोर त्याला बोलणं, त्याच्यासोबत तुलना करणे, तुझा भाऊ बघ छोटा असून कशी लघवी नाही करत रात्री शिक त्याच्याकडून काही, अशी उदाहरण देऊन “motivate” करण्याचा प्रयत्न करणे हे सगळं पालकांनी करुन पाहिलं. पण प्रश्न काही सुटेना. बिछाना काही कोरडा राहीना.

साम, दाम, दंड, भेद, मंत्र-तंत्र, उपास-तापास सगळं सगळं करुन झालं, आणि शेवटी अगदी नाईलाजाने फॅमिली डॉक्टर नि पाठवल्यावर ते मानसोपचारतज्ञांकडे (psychiatrist) कडे आले.


“तो मुद्दाम बिछान्यात लघवी करतो म्हणजे काय”? डॉक्टरांनी विचारलं. वडील जरा वैतागूनच म्हणाले, “अहो सांगितलं ना, तो रात्री झोपेत शू करतो. अजून, इतका मोठा झाला तरी. कधी कधी तर वाटतं, मुद्दाम आम्हाला त्रास द्यायला करतो तसं.”


“अहो मग त्याला तुमच्या बिछान्यात झोपवू नका ना त्याला वेगळा झोपू द्या”. डॉक्टरांनी सुचवलं. मुलाचे वडील आता काहीसे त्रासून म्हणाले, “अहो काय बोलताय तुम्ही. १५ वर्षाचा आहे तो, त्याचा तो एकटा झोपतो. त्याच्याच बेड मध्ये शू करतो तो.”


डॉक्टरांनी जरा विचार केल्यासारखं केलं आणि म्हणाले, “म्हणजे तो झोपतो त्याच बिछान्यात शू करतो, रात्रभर शू ने भिजलेल्या गादीत व कपड्यात झोपतो, या समस्येमुळे कुठेही जात नाही, ट्रीप किंवा कॅम्प ला जाऊ शकत नाही, सगळ्यांकडून यासाठी बोलणी खातो, हे सगळं तो मुद्दाम करतो असं तुम्हाला खरंच वाटतं का? काय मिळतंय हे करुन त्याला?”


क्षणभर काय बोलायचं हे वडिलांना सुचलं नाही, तरी ते पुढे म्हणाले “हा विचार त्याने नको का करायला, हे असं वागून त्याचं किती नुकसान होतंय ते!”


जरा थांबून डॉक्टर म्हणाले, “बर, मला सांगा, त्याला दिवसा कपड्यात लघवी होते का? शाळेत असताना, अभ्यास करताना, खेळताना, जेवताना, मित्रांसोबत मजा करताना एकदा तरी असं घडलंय का?” यावर आई-वडीलांनी थोडा विचार केला आणि ठामपणे उत्तर दिलं, “नाही हो. दिवसा असं कधीच होत नाही.”


पुढचा प्रश्न डॉक्टरांनी विचारला मुलाला, “मला सांग, दिवसा जेव्हा तुला शू करायची जाणीव होते, ती तू थांबवू शकतोस का? समज तू वर्गात बसलायस, आणि तुला शू करायची गरज भासली, तर थोडा वेळ तरी तू ती थांबवू शकतोस का?” मुलाने अगदी पटकन् “हो, मी तर तास संपेपर्यंत थांबवू शकतो. (जरा संकोचून पुढे म्हणाला) कधी कधी तर आम्ही मित्र पैज लावतो, कोण जास्त वेळ थांबवू शकतो ते.” या वाक्यावर वातावरण जरा निवळलं, सगळ्यांच्या चेहर्यावर स्मितहास्य उमटलं. शेवटचा प्रश्न मानसोपचारतज्ञांनी विचारला मुलाला, “मला सांग, रात्री झोपेत आपल्याला लघवी येतेय ही जाणीव तुला होते का?” यावर त्यानं अगदी स्पष्ट उत्तर दिलं, “कधीच नाही, मला तर अनेकदा मला शू झालीये, कपडे, गादी भिजली आहे हे पण लक्षात येत नाही.” यावर आई वडील काहीसे चमकले.


यानंतर मुलाच्या जडणघडणीची माहिती घेणे, घरातील वातावरण, मुलाचा स्वभाव आणि मानसिकता, खाण्या-पिण्याच्या सवयी, झोपण्याच्या सवयी जाणून घेणे, मुलाची चिकित्सक तपासणी (clinical and neurological) करणे हे झाल्यानंतर डॉक्टरांनी पालकांना काही रक्त व लघवीच्या काही जुजबी तपासण्या करायला सांगितल्या. पालक उत्साहाने म्हणाले, “डॉक्टर, हे झाल्यापासून आम्ही गूगल वर खूप शोध घेतला, आणि आम्ही बहुतेक सगळ्या तपासण्या करुन घेतल्या आहेत.” डॉक्टरांनी सर्व तपासण्या पाहिल्या (त्यातील बहुतेक अनावश्यक होत्या), त्या सर्वच्या सर्व पूर्णत: नॉर्मल होत्या!


डॉक्टर पालकांकडे वळून म्हणाले, "माझ्याकडे तुमच्यासाठी एक चांगली बातमी आणि एक काहीशी वाईट बातमी आहे. चांगली बातमी अशी, की तुमच्या मुलाला counseling ची अजिबात गरज नाही. तो हे सर्व मुद्दाम करत नाही आहे. त्यातल्या त्यात वाईट बातमी अशी आहे, की त्याला Primary Nocturnal Enuresis हा आजार आहे." थोड्याश्या शांततेनंतर, आई म्हणाली, "डॉक्टर, तुम्ही म्हणताय तो मुद्दाम करत नाही, त्याला counseling ची गरज नाही, त्याला enuresis आजार आहे, म्हणजेच urine बाबतीत काही तरी प्रॉब्लेम आहे, मग आम्हाला तुमच्याकडे (psychiatrist कडे) का पाठवलं आमच्या डॉक्टर नी?)


"अतिशय सोप्या शब्दात सांगायच तर, तुमच्या मुलाची लघवी ची पिशवी रात्री जेव्हा भरते, ती भरल्या भरल्या पूर्णपणे रिकामी होते, म्हणजेच enuresis. हा urine चा प्रॉब्लेम नाहीच आहे. म्हणून तर तुम्ही करून घेतलेल्या सगळ्या तपासण्या, सोनोग्राफी हे सगळं नॉर्मल आलेलं आहे." डॉक्टर अतिशय शांतपणे म्हणाले.


"पण मग का करतोय लघवी तो झोपेत?" पालक अजून तो लघवी करतोय यावर अडून होते.


"तुम्ही जर नीट आठवलं, तर मी मगासपासून त्याला लघवी होते असं म्हणतोय, तो लघवी करतो असं म्हणत नाहीये." डॉक्टर म्हणाले. पालकांच्या चेहऱ्यावर काहीसा अविश्वास होता, ते बघून पुढे म्हणाले, "जरा विचार करा, त्याला कपड्यात लघवी ही फक्त रात्री झोपेतच होते, दिवसभरात कधीही होत नाही. तुम्ही अजून एक गोष्ट नोटिस केली असेल, ती म्हणजे त्याला जी झोपेत लघवी होते, ती बहुतेक वेळेस मध्यरात्री नंतर, किंवा पहाटेच्या वेळेस होते, बरोबर ना?" पालकांनी मान डोलावली.


डॉक्टर बोलत राहिले, "असं पहा, nocturnal enuresis या नावातच प्रॉब्लेम लिहिलेला आहे. तो म्हणजे, रात्री (nocturnal) झोपेत होणारी लघवी. नेहमी आपली झोप ही rem-nrem अशा दोन टप्प्या मध्ये येत असते. या दोन्ही फेज आलटून पालटून येत असतात, त्यामुळे आपल्याला गाढ झोप लागत असते. कधी कधी मात्र, या फेज मधील समन्वय हरवतो, ज्यामुळे झोप तर लागते, पण जशी हवी तशी लागत नाही. अनेकदा, nrem ची स्टेज गळून डायरेक्ट rem ची स्टेज सुरू होते. त्यामुळे, हलकी झोप वाढत वाढत जाऊन गाढ झोप लागणे असं न होता, डायरेक्ट गाढ झोप लागते. अशी झोप लागली, की शरीरातील सर्व स्नायू रीलॅक्स होतात, यात लघवी च्या पिशवी चे (bladder muscles) आणि त्या पिशवी च्या तोंडचे (sphincter) देखील आले.


आपण जेव्हा जागे असतो, आणि bladder भरत आली, की हे मसल वर ताण येतो, आणि आपल्याला लघवी करायची आहे जी जाणीव होते. गाढ झोप लागली असताना, हे मसल पूर्ण रीलॅक्स झालेले असतात, त्यामुळे पिशवी भरली, की आपल्याला जाणीव व्हायच्या आत ती पटकन रिकामी होते."


मुलाची आई पटकन म्हणाली, "डॉक्टर बरोबर आहे, अनेकदा तो झोपेत बोलत असतो, बडबड करत असतो, खूप चुळबुळ करत असतो, त्याची झोप कधीच नीट नसते. आम्हाला वाटलं, की त्याला काही शारीरिक श्रम नाहीत, म्हणून त्याची झोप अशी असेल. मोठा झाला की होईल ठीक. पण आम्हाला सांगा, हा मानसिक आजार आहे का?"


" अगदी theoretical लेवल ला म्हटलं, तर हो, कारण त्याची झोप बरोबर नाही आहे. झोपेच्या दोन स्टेज नीट काम करत नाहीत, आणि हे करणं हे पुष्कळदा मानसिक स्थिति, आणि क्रिया याच्याशी जोडलेलं असतं, पण जर तुम्ही विचारत असाल, की त्याला गंभीर मानसिक आजार आहे का, तर त्याचं अगदी स्पष्ट उत्तर आहे अजिबात नाही."


इतका वेळ हे सगळं ऐकणाऱ्या मुलानेच पुढाकार घेऊन विचारलं, "म्हणजे हे बरं होऊ शकतं? काय करावं लागेल? कारण दहावीची परीक्षा झाली की माझे मित्र camping ट्रीप प्लॅन करत आहेत. आत्ता पर्यन्त मी त्यांना नाही येणार असंच सांगत होतो. पण जर हे सगळं थांबणार असेल, तर मला त्या ट्रीप ला जायचंय."


शांतपणे, डॉक्टर म्हणाले, "कोणतीही समस्या सोडवण्यासाठी (managing bedwetting in children) 3 गोष्टी लागतात, 1) ती समस्या स्वीकारली पाहिजे, 2) ती सोडवण्यासाठी जे काही करावं लागेल त्याची पूर्ण मानसिक तयारी सगळ्यांनी केली पाहिजे आणि 3) ती सोडवतान अडचणी आल्या, तरी एकमेकांना सपोर्ट करून त्या अडचणी सोडवायला मदत केली पाहिजे.


हे वाटतं तितकं सोपं नाही. स्वीकारणे म्हणजे फक्त मान्य करणे नव्हे. तुमच्या पूर्ण कुटुंबाने हे मनापासून स्वीकारलं पाहिजे की हा आजार आहे, तो हे मुद्दाम करत नाही. हे तुम्ही स्वीकारलं हे कळणार कसं? तर अगदी सोपं आहे. आज पर्यन्त जेव्हा जेव्हा त्याला लघवी व्हायची, तुम्ही कसे रेंकट करायचात? रागावत असाल, तुलना करत असाल, कोणी चिडवत देखील असेल. हे असं होण्याचं एक कारण म्हणजे तो मुद्दाम किंवा आळसापोटी हे करतो असं तुम्हाला वाटत होतं. पण आता जेव्हा तुम्हाला हे होण्याचं कारण समजलं आहे, आणि जर तुम्ही ते स्वीकारलं आहे, तर तुमच्या reactions बदलल्या पाहिजेत. तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने ते स्वीकारलं असं होईल.


हे करून त्याची लघवी थांबणार आहे का? तर नाही. पण, आपण मुद्दाम करत नाही, हे त्याला समजेल, तुमच्या बदललेल्या reactions मुळे त्याला तुमच्या बद्दल, तुमच्या सपोर्ट बाबत विश्वास वाटेल, तो शांत आणि relaxed होईल, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, तुमच्या घरातलं वातावरण हसतं खेळतं होईल."


पालक आणि मुलगा आता शांत झाले होते, आणि नीट ऐकत होते.


"याचा पुढचा टप्पा म्हणजे स्वत: मध्ये बदल करणे. आपल्याला झोप आणि झोपेचा दर्जा दुरुस्त करायचा आहे. त्यामुळे, स्वतः च्या काही सवयी, आवडी निवडी यात बदल करावे लागतील. विशेषत जेवणाची वेळ, झोपेची वेळ या बाबतीत काही शिस्त पाळावी लागेल. लक्षात ठेवा, झोप ही कमवावी आणि टिकवावी लागते. त्यासाठी झोपेची पथ्ये पाळावी लागतात, त्याला sleep hygeine असं म्हणतात." असं सांगून डॉक्टरनि एक माहिती पत्र त्या तिघांना वाचायला दिलं.


पालकांनी एकमेकांकडे पहिलं, आणि चाचरत विचारलं, "डॉक्टर याला काही औषध घ्यावं लागेल का? आम्ही google वर बघितलं, मानसिक आजाराच्या औषधांबबत खूप वाईट लिहिलेलं होतं. आम्हाला त्याची थोडी काळजी वाटते. "


"enuresis वर पहिला उपचार हा behaviour modification therapy हाच आहे. त्यामुळे आज आपण लगेच औषध उपचार नाही करणार. मात्र, जर केवळ behaviour modification ने आपल्याला हवा तो रिझल्ट नाही मिळाला, तर आपल्याला औषध वापरावं लागेल, कारण आपल्याला वेळ जास्त वाया घालवून नाही चालणार. लक्षात ठेवा, जगात प्रत्येक गोष्टीचे चांगले आणि वाईट परिणाम असतात. कोणतीही गोष्ट मिळवायची, तर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. साइड इफेक्ट ना भिऊन effect कडे दुर्लक्ष करू नका. औषध देताना जी काळजी घ्यावी लागते ते सर्व आपण घेउच, शिवाय साइड इफेक्ट होण्याचं प्रमाण हे हजारात किंवा दहा हजारात 1 इतकं दुर्मिळ असतं. त्यामुळे सकारात्मक दृष्टी ठेवा. फक्त साइड इफेक्ट चा विचार केला, तर आपण चहा सुद्धा पिऊ शकणार नाही."


काहीसे समाधानी होऊन ते कुटुंब निघून गेलं आणि आठवड्या नंतर पुनः फॉलो आप साठी आलं. त्या 7 दिवसात, 2 रात्री पूर्ण कोरड्या गेल्या (ज्यात रात्री अजिबात लघवी झाली नाही.) सुरुवातीला, सांगितलेले सगळे बदल करणे, सवय बदलणे त्या मुलाला जड गेलं, कारण वर्षानुवर्षे लागलेली सवय अशी काही तासात मोडता येत नाही. पण आई वडिलांनी दिलेला सपोर्ट, धाकट्या भावाने केलेली मदत आणि दिलेला पाठिंबा आणि सर्वात महत्वाचं, म्हणजे घरातलं बदललेलं वातावरण यामुळे सांगितल्या पैकी बऱ्यापैकी बदल त्या मुलाने केले. हळूहळू कोरडे दिवस वाढत चालले, आणि त्या मुलाचा आत्मविश्वास आणि आनंद परत येऊ लागला.


त्या मुलाला enuresis वर पूर्ण विजय मिळवायला जवळपास 3 महीने लागले, पण इच्छाशक्ती, सपोर्ट, आनंदी वातावरण या सर्वांच्या बळावर त्याने ते करून दाखवलंच. हा लेख लिहीत असताना, तो मुलगा ठरल्या प्रमाणे त्याच्या मित्रांसोबत कॅम्प ला जाऊन तिथे मित्र मंडळी सोबत धमाल करून परत आला. त्याचा वाढलेला आत्मविश्वास आणि बदललेला स्वभाव आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, त्या कुटुंबाने स्वीकारलेली वस्तुस्थिती यामुळे त्या कुटुंबाच आयुष्य बदलून गेलं.


Nocturnal Enuresis ही समस्या जवळपास 8 ते 16 टक्के मुलांना ल्हाणपणात असते. अगदी दुर्मिळ केस मध्ये ती तरुणपण आलं तरी शिल्लक राहू शकते. अनेकदा, या कुटुंबात होते, तसे अनेक गैरसमज आणि चुकीच्या कल्पना मुळे त्याकडे दुर्लक्ष होतं. Enuresis हा धोकादायक किंवा गंभीर आजार नसला, तरी त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. मुलाचा आत्मविश्वास खचणे, स्वभाव बदलणे, घरातील वातावरण बिघडणे, शाळा किंवा इतर ठिकाणी जाऊ न शकल्याने अनेक संधी हुकणे असे परिणाम केवळ त्या मुलावरच नव्हे, तर संपूर्ण घरावर होऊ शकतात. Enuresis वर behaviour therapy, औषधोपचार, जीवनशैली बदल आणि झोपेची पथ्ये पाळून उपचार करणे शक्य आहे. या बाबत अजून जाणून घेण्यासाठी, तुमचे डॉक्टर, pediatrician, किंवा जवळचे मानसोपचारतज्ञ (psychiatrist) यांच्याशी संपर्क जरूर साधा.




 
 
 

Comments


bottom of page