top of page
Search
  • Writer's pictureDevavrat Harshe

तुमच्या मधील Sherlock ला करा Unlock (Rational And Cognitive Approach To Behaviour)

Sherlock Holmes म्हटलं की डोळ्यापुढे येतं 19 व्या शतकामधलं लंडन, त्याची County Cap, तोंडातील पाइप, त्याचं काहीसं रुक्ष आणि एकलकोंड वागणं, त्याची बुद्धिमत्ता, त्याने सोडवलेली कोंडी, त्याची अफाट लोकप्रियता! त्याच सोबत आठवतात, त्याची काही प्रसिद्ध वाक्यं:




"Its elementary, my dear Watson!" (अरे वॉटसन, हे तर खूपच सोपं होतं.)


Holmes ला कोणतीही केस, कोणतंही रहस्य सोपं कसं वाटतं किंवा माणसाकडे नुसतं पाहून त्याचा व्यवसाय, त्याच्या अडचणी, त्याची कौटुंबिक स्थिति याबाबत अचूक आडाखे बांधणे हे त्याला कसं जमतं असा प्रश्न आपल्याला पडतो. कसं शक्य होतं हे सगळं त्याला?


प्रत्येक रहस्याचा भेद केल्यावर वॉटसन, जो स्वत: एक उत्तम सैनिक आणि डॉक्टर असतो, तो भाबडेपणाने Holmes ला विचारतो, "Holmes, तुला कसं काय हे जमलं?" हा प्रश्न विचारल्यावर, Holmes त्याला "Its elementary, dear Watson" असं म्हणतो, आणि पुढे हे सोडवण्याची त्याची शैली (Science Of Deduction - तर्क आणि निष्कर्ष यांचे विज्ञान) मांडतो. काय आहे हे विज्ञान?


Homes म्हणतो, कोणतीही घटना जेव्हा घडते, तेव्हा त्याची कारणे, त्याचे परिणाम यांचे काही पुरावे मागे राहून जात असतात. त्यामुळे घटना समोर ठेवून, एका मागून एक तर्क यांची मांडणी जर आपण करत गेलो, आणि एक एक शक्यता जर आपण निकाली काढत गेलो, तर आपल्याला त्या घटने मागचं योग्य ते स्पष्टीकरण आपोआप मिळतं. इतकंच नाही, तेच तर्क जर इतर कुणीही एका मागोमाग मांडले, तर सर्वसाधारण पणे त्याला तेच उत्तर मिळेल! हे सांगून Holmes जेव्हा त्या केस बाबत रहस्य भेद करतो, तेव्हा वॉटसन म्हणतो, "अरेच्चा, हे तर इतकं सोपं होतं, मला कसं नाही सुचलं?" कारण Holmes चे तर्क आणि निष्कर्ष Watson ला पटलेले असतात.


पण हे Science of Deduction शिकायचं कसं आणि कुठे? त्याची practice कशी करायची? (Learning the basics of cognitive and rational theories of behaviour).


मंडळी, हे Science Of Deduction आपल्याला निसर्गत: मिळालेलं असतं. त्यासाठी कोणता कोर्स करावा लागत नाही, फी भरावी लागत नाही. मुलं जशी मोठी होत जातात, तशी त्यांची विचार करण्याची शक्ती विकसित होत जाते. असं पहा, अगदी, लहान मुलांना काहीही थाप मारली तरी ती त्यांना पटते, आजूबाजूला कुणी दिसलं नाही, तर मुलं पटकन रडायला लागतात. बहुतेक वेळेस लहान मुलं खोटं बोलत नाहीत, अगदी एखाद्याच्या तोंडावर "तू दुष्ट आहेस" किंवा "मला हा खाऊ नाही आवडला" असं सरळ सांगतात, कारण खोटं बोलण्याइतका विचार करणे त्यांना जमत नसतं.


वयाच्या साधारण 11 ते 15 या वयात मुलांमध्ये ही क्षमता निर्माण व्हायला लागते. हळूहळू खालील प्रकारे विचार करणे मुलं शिकतात:


1) अमूर्त कल्पना: अनेक गोष्टी या प्रत्यक्षात समोर नसतात, पण त्या आपल्याला गृहीत धरायला लागतात. उदा: गणितातला "क्ष" किंवा Sin, Cos अशा कल्पना. प्रत्यक्षात मला क्ष दाखवा म्हटलं तर ते शक्य नाही. पण मनात एक कल्पना धरून ती फुलवणे, तिच्या बाबत विचार करणे आता शक्य होते.


2) विचाराचा विचार: "परवा दिवशी तू ते तसं म्हणालास, आज तुला काय वाटतं तुझ्या मताबाबत?" असं जर कुणी विचारलं, तर आपल्याला आधी आपण त्या दिवशी काय म्हणलो ते आठवलं पाहिजे, ते म्हणायच्या आधी काय विचार केला हे आठवलं पाहिजे, आणि मग तो विचार योग्य की आयोग्य याचा विचार केला पाहिजे. ही क्षमता मुलामध्ये 11-15 या वयामध्ये विकसित होते.


3) समस्या-समाधान: लहान मुलं छोट्या छोट्या समस्या आल्या की रडतात, किंवा हातातील वस्तू सोडून देतात. साधारण 11-15 वयातील मुले विचार करतात, प्रयत्न करतात, एखादी युक्ति किंवा वस्तू वापरुन समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात.


4) "जर-तर" विचार: "जर तू असं केलं नसतं तर काय झालं असतं?" या प्रश्नाचं उत्तर देणं खूप किचकट आहे. त्यासाठी दोन्ही शक्यता, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या, परिणाम यांचा एकत्र विचार करून ते एकाच वेळेस analyse करून उत्तर देणं कठीण आहे. ही क्षमता मुलं साधारण 11 वयानंतर आत्मसात करतात.


आणि


5) सिद्धांत-तर्क-निष्कर्ष विचार: Hypothetico-Deductive Thinking: समोर असलेली माहिती नीट पाहणे, त्यावरून एक theory ठरवणे, एका मागून एक तर्क मांडणे, आणि निष्कर्ष काढणे ही क्षमता मुले या वयात शिकतात, आणि विकसित करतात. उदा: काल डब्यात 2 बिस्किटे होती, आज एकच शिल्लक आहे, मी ते खाल्लं नाही, आई बाबांना ते आवडत नाही, याचा अर्थ ते बहुतेक दादाने खाल्लं असणार. हे आपल्याला वाचताना सोपं वाटेल, पण खूप लहानपणी मुलं अशा प्रकारे विचार करू शकत नाहीत.


अरेच्चा, हे Deductive Reasoning म्हणजे Holmes ज्याला Science Of Deduction म्हणतो तेच दिसतंय.मग जर मुलांकडे ही क्षमता असते, तर ती मोठेपणी कुठे जाते? मी असा विचार करून प्रॉब्लेम का सोडवू शकत नाही?


तर मंडळी, इथे Holmes ची मेहनत दिसते. जी ताकद निसर्गाने त्याला दिली, तीच जवळपास सर्व नॉर्मल बौद्धिक वाढ झालेल्या माणसांना दिलेली आहे. पण तरी Holmes वेगळा आहे. एक गोष्ट जी तो सातत्याने करतो, प्रयत्न पूर्वक करतो, ती म्हणजे तो विचार करताना त्यावर भावना, त्याची मतं, त्याची इच्छा या सर्व गोष्टी कटाक्षाने दूर ठेवतो. त्यामुळे एकामागून एक तर्क मांडणे त्याला शक्य होतं. पुष्कळ वेळेस, Holmes ला दिसणारं सत्य कठोर किंवा कडवट असतं (जसं The Mystery Of The Sussex Vampire या केस मध्ये घडतं), कधी कधी, Holmes वरकरणी निर्दयी वाटणारी पद्धत वापरुन प्रसंगी त्याच्या आशिलच्या भावना दुखावून त्याला न्याय मिळवून देतो, (जसं The Mystery of The Blue Carbuncle) मध्ये घडतं.


आपण मात्र, समोर दिसणारी माहिती आधी भावनिक होऊन बघत असतो. एक साधं उदाहरण घ्या:

समजा शाळेत पालक सभेला पालक जमलेत, आणि शिक्षकांनी जर मुलाची प्रगती चांगली नाही, किंवा मुलाच्या वागण्यातील तक्रार सांगितली, तर या तक्रारीकडे लोक कसे पाहतील?

1) काही लोक शिक्षकांचे पूर्ण ऐकून घेतील, समस्या जाणून घेतील. नक्की चूक काय होते ही समजून घेतील. ती सोडवण्यासाठी काय करावं लागेल याची चर्चा करतील, मुलासोबत बोलतील.

2) काही लोक शिक्षकांशी भांडतील, वाद घालतील. आपल्या मुलाचीच बाजू कशी योग्य हे हिरीरीने सांगत राहतील. अगदी चूक मान्य केली, तरी जबाबदारी शिक्षकांवर घालतील. नक्की समस्या काय आहे हे जाणणे व सोडवणे याचा प्रयत्न करणार नाहीत.

3) काही लोक तक्रार ऐकून घेतील, समजून घेतील. पण मुलावर राग काढतील, धपाटा घालतील.

बहुतेक भावनेच्या भरात परिस्थितीकडे पाहतील, ते भावनेच्या आहारी जाऊनच निर्णय घेतील, आणि जे सत्य समोर दिसतंय, त्याकडे पाहू शकणार नाहीत, किंवा ते पाहूनही पचवू शकणार नाहीत. यातून होतं असं, की समोर काहीही दिसलं, तरी आपली पहिली प्रतिक्रिया भावनिक यायला लागते, जी विचाराला , विवेकाला मागे टाकते. प्रत्येकाच्या सभावानुसार कोणती भावना विवेकाला मागे टाकेल हे ठरत असतं. विवेकाला भावनेने जखडून ठेवल्यामुळे सोपे प्रश्न अवघड होऊन जातात, कधी कधी भलतीच उत्तरे मिळतात, आणि भावनेच्या भरात ती योग्यही वाटतात. Holmes च्या काही कथामध्ये पोलिसांनी मनात गुन्हेगार कोण असेल हे मनात आधीच ठरवलेल असतं, आणि त्यामुळे समोर येणारं सत्य विवेकी विचार पोलिस करत नाहीत, तिथे Holmes चं तर्कविज्ञान उपयोगी ठरतं आणि निर्दोष व्यक्तीला न्याय मिळवून देतं जसं The Norwood Builder या कथेत घटतं.


मग तुम्ही म्हणाल, की ही भावना, मतं दूर ठेवणं, कसं काय शक्य आहे? तर हे जमतं, प्रॅक्टिस करून आणि ट्रेनिंग करून. जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुटीत स्विमिंग पूल वर गेलात, तर शिकायला अनेक लोक, मुलं आलेली असतात. काही जण खूप घाबरलेले असतात, मुलं रडत असतात, मात्र ते शिक्षक कधी प्रेमाने, कधी दम देऊन, कधी रागावून मुलाला पाण्यात घेतात, योग्य वेळेस पाण्यात ढकलतात देखील! हे सगळं पालकांना खूप क्रूर वाटतं, निष्ठुर वाटतं, पण शिक्षक भावनेने विचार करत नाहीत, तर ते तर्क लावून विचार करत असतात, कधी कधी ते पालकांना देखील रागावतात. पण बहुतेक मुलांना पोहायला शिकवण्यात ते यशस्वी होतात, कारण वर्षानुवर्षे शेकडो मुलांना शिकवून, अनुभव घेऊन, त्यांचं जजमेंट अगदी चपखल विकसित झालेलं असतं.


याचं अजून एक उदाहरण म्हणजे वैद्यकशास्त्रात. सुरुवातीला, शिकत असताना, रुग्ण, त्यांना होणारा त्रास, त्यांची वेदना या सगळ्या गोष्टी सगळ्या विद्यार्थ्यांना खूप बेचैन करतात, सुरुवातीला निर्णय घेताना भावनांचा अडथळा येतो. मात्र हळू हळू सरावाने, ट्रेनिंगमुळे, डॉक्टर भावना बाजूला ठेवून निदान करणे, उपचार सुचवणे अशा गोष्टी करू शकतात. डॉक्टर शक्यतो स्वत:च्या जवळच्या व्यक्तींचे उपचार स्वत; करत नाहीत, याचं कारणच हे आहे, की भावना बाजूला ठेवून तर्क लावून विचार व कृती करणे जवळच्या व्यक्तीसोबत शक्य होईलच असे नाही.


पण मग इतकं कडवट, इतकं निष्ठुर आणि इतकं तार्किक होणं गरजेचं आहे का?

प्रत्येकाकडून चांगलं ते घ्यावं असं आपण म्हणतो. त्यामुळे आपण Holmes कडून त्याची Science Of Deduction वापरण्याची पद्धत घेऊ, पण ती योग्य वेळेस वापरण्यासाठीच! Holmes हा भावनांच्या इतका पलीकडे गेलेला असतो, की तो स्वत: सोडवलेल्या गुन्ह्याचं क्रेडिट देखील Inspector Lestrade या स्कॉटलंड यार्ड मधील अधिकाऱ्याला देत असतो. लोकांकडून कौतुक होईल, आपण प्रसिद्ध होऊ याचा त्याला इतका तिटकारा असतो, की तो त्याच्या कथा देखील Watson ला लिहू देताना आढेवेढे घेत असतो. Holmes रहस्य सोडवून झाल्यावर देखील या मोड मधून कधी बाहेर येत नाही. तो Dr Watson, त्याची Housekeeper मिसेस हडसन या सगळ्या जवळच्या व्यक्ती सोबत तितकाच रुक्ष आणि अंतर ठेवून वागत असतो. मात्र आपण सोडवलेल्या रहस्याचा, मिळालेल्या उत्तराचा योग्य वापर कसा करायचा हे ठरवताना Holmes मात्र तितका रुक्ष राहत नाही. तो अनेकदा तर्क बाजूला ठेवतो, आणि प्रसंगी अगदी भावनिक वाटावी अशी कृती करतो किंवा सल्ला देतो, जसं The Adventure Of Abbey Grange या प्रकरणात होतं. आपल्याला देखील हे विज्ञान वापरायचं आहे,पण योग्य ठिकाणी, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने.

हे सगळं वाचून असा प्रश्न पडला असेल, की मी तर गुप्तहेर नाही, एक नोकरदार आहे, मला या सगळ्याचा काय उपयोग होणार? हे भावना बाजूला ठेवायचं ट्रेनिंग कसं करायचं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे: पुढील भागात.



Dhanvantari Nursing Home Neuropsychiatry Centre

331, E, Off Wilder Memorial Church, New Shahupuri

Kolhapur, 416001.

Phone: +91-9167577279


78 views0 comments

Comments


bottom of page