top of page
Search
  • Writer's pictureDevavrat Harshe

Obsessive Compulsive Disorder (OCD): एक झुंज स्वत:शी

शीर्षक वाचून विचित्र वाटेल, पण OCD या आजाराचं हेच तर मूळ आहे. साधारणत: माणसाला होणारे बहुतेक आजारांची लक्षणे ही शरीराच्या बाहेरील घटकांमुळे होतात, किंवा त्यांवर माणसाचं काही नियंत्रण नसतं, उदा: रक्तदाब, रक्तातली साखरेची पातळी, क्षयरोग, कॅन्सर, मासिक पाळीच्या समस्या इ. अगदी ठरवलं, कसून प्रयत्न केले, तरी माणूस यापैकी काहीही स्वत: नियंत्रित करु शकत नाही.


OCD मध्ये मात्र, माणूस, मनात येणार्या चित्र-विचित्र विचार, व ते थांबवण्यासाठी करायला लागणार्या गोष्टी यांच्या जाळ्यात अडकतो, व अजून फसतच जातो. या आजाराचं वेगळेपण म्हणजे, जे आपले विचार, एरवी आपल्या नियंत्रणात असतात, पाहिजे त्या कल्पनेच्या जगातून आपल्याला फिरवून आणत असतात, आपल्याला स्वप्नं दाखवतात, प्रेरणा देतात, हसवतात, तेच आपले शत्रू होतात!


सुरुवातीला, हे विचार, “मला काही झालं तर?” किंवा “माझे हात अस्वच्छ आहेत, स्वच्छ नाही केले, तर काही तरी संसर्ग होईल” अशा स्वरुपाचे असतात. वर वर वाटताना, हे बरोबर वाटतं, व ते थांबवण्यासाठी माणूस अगदी स्वाभाविक कृती करतो, म्हणजेच हात धुतो. समस्या अशी होते, की हात धुतल्यानंतर मेंदू ला, हात धुतलेत व ते स्वच्छ झालेत हे पटतच नाही! त्यामुळे मग पुन्हा हात धुवा. पुन्हा स्वच्छ झालेले नाहीत असं वाटतं, मग पुन्हा जा बेसिनकडे अशा चक्रात माणूस अडकतो. हे विचार इतके सतत येतात, की जसे काही ते माणसाला पछाडतात, म्हणूनच त्यांना Obsessions असे म्हणतात. दुर्दैव म्हणजे, प्रत्येक वेळेस ती कृती केल्याने, मेंदू मध्ये “चुकीचा विचार (obsession)” व तो थांबवणारी कृती (compulsion) यांची सांगड घातली जाते, त्यामुळे ती कृती केल्याशिवाय तो विचार थांबता थांबत नाही. साध्या भाषेत सांगायचं, तर गणित सोडवताना समजा तुम्हाला बरोबर उत्तर मिळालं, पण जर “हे उत्तर बरोबर आहे का?” ही शंका येत राहिली तर? उत्तर समोर असून देखील, ते आपल्या मेंदूला व मनाला दिसत नाही, त्यामुळे तेच गणित आपण पुन्हा पुन्हा सोडवत बसू. हीच गोष्ट होते OCD मध्ये.


OCD मध्ये साधारण खालील प्रकारचे obsessions व compulsions आढळून येतात.

  1. contamination (स्वच्छता व संसर्ग)

या प्रकारात, आपण, आपले शरीर, शरीराचा अवयव, घर किंवा आजूबाजूच्या वस्तू घाण झालेल्या आहेत, व स्वच्छ करुन देखील त्या अस्वच्छच आहेत हा चुकीचा विचार वारंवार येत राहतो. तो थांबवण्यासाठी व्यक्ती मग, हात धुणे, पाय धुणे, वारंवार स्वच्छता करणे, आंघोळ करणे, बाथरुम/शौचालयातून आल्यावर खूप वेळ स्वच्छता करत राहणे या कृती वारंवार करत राहते.


  1. pathological doubt (भीती व अकारण चिंता)

या प्रकारात साधारणत: आपण, आपले कुटुंबिय, व्यवसाय, किंवा जवळचे यांना काही तरी अपाय होईल, त्यांचे आरोग्य धोक्यात येइल, नुकसान होईल अशा प्रकारची अकारण चिंता वारंवार डोक्यात येत राहते, जी निवारण्यासाठी व्यक्ती मनात प्रार्थना करणे, काही विशिष्ट हातवारे करणे, मनातल्या मनात काही ठराविक शब्द पुटपुटणे, पुन्हा पुन्हा दरवाजाचे कुलुप, किंवा दिव्याचे बटण चेक करणे अशा गोष्टी वारंवार करत राहते.


  1. समतोल (symmetry)

या प्रकारात, आजूबाजूला ठेवलेल्या वस्तू नीटनेटक्या आहेत की नाही, त्यांत समतोल आहे किंवा नाही, या विचाराने मन पछाडून जाते. ते निवारण करताना व्यक्ती पुन्हा पुन्हा वस्तू आवरुन ठेवणे, वस्तूंमधील अंतर व समतोल नीट साधणे, चालताना एका ठराविक पद्धतीने चालणे, क्रम चुकल्यास किंवा ठरलेला नियम मोडला गेल्यास पुन्हा मागे येणे अशा गोष्टी करत राहते.


OCD: उपायाची गरज काय?

वरवर वाचताना, हे सगळं वर्णन काही विशेष वाटत नाही. कुणालाही हेच वाटेल, की “अरे, हे तर चांगलंच आहे ना, की स्वच्छतेची इतकी आवड आहे, घर नीटनेटकं राहील.” किंवा, “अरे, पुन्हा पुन्हा तपासून पाहणे ही तर चांगली सवय आहे, अशाने चुका होत नाहीत.” याच विचारामुळे, OCD सुरुवातीच्या काळात दुर्लक्षिला जातो. या सवयी चांगल्या वाटतात, त्याचं कौतुक ही होतं.


हळूहळू जसा OCD चा प्रभाव वाढत जातो, तसं तसं मग हे कौतुक टोमण्यामध्ये रुपांतरित होतं. OCD च्या वाढत्या लक्षणांमुळे केवळ व्यक्तीच नव्हे, तर संपूर्ण घर त्रासून जातं:

  1. सतत स्वच्छतेमुळे वाया जाणारा वेळ (जो अनेकदा काही तासांमध्ये असतो).

  2. सतत पाण्यात व साबणाशी संपर्क आल्यामुळे हात, पाय व त्वचेवर पडणारे घट्टे व allergies (washerwoman’s hands and contact dermatitis).

  3. वारेमाप पाण्याचा वापर केल्याने पाण्याची होणारी नासाडी.

  4. पुन्हा पुन्हा कुलूप, बटण तपासत बसल्याने वाया जाणारा वेळ व अनेकदा मोडणार्या वस्तू.

  5. चारचौघात, किंवा परक्या लोकांसमोर compulsions करावे लागल्याने होणारा संकोच, व त्यामुळे सामाजिक कार्यात किंवा सोहळ्यास जाताना होणारी टाळाटाळ.


या व अशा अनेक परिणांमामुळे, OCD चा त्रास सर्व कुटुंबाला होतो. इतर आजारांप्रमाणे, या आजाराने ग्रस्त व्यक्तीला सहानुभूती पटकन मिळत नाही, कारण विचार आपल्या नियंत्रणात असतात, त्यामुळे ती व्यक्ती हे सर्व मुद्दाम करते आहे, किंवा पुरेसे प्रयत्न करत नाही असा शिक्का मारला जातो.


ही लक्षणे, त्यांचा परिणाम यामुळे मनावरील ताण वाढत जातो, परिणामी ताण (stress), नैराश्य (depression), निद्रानाश (insomnia), व्यसनाधीनता (addiction) या मानसिक आजारांचा धोका वाढतो.


OCD होण्याचं कारण काय?

कोणत्याही इतर आजाराप्रमाणे OCD ची लक्षणे निर्माण होण्याची कारणे:

  1. जनुकीय: कुटुंबात असणारी मानसिक आजाराची पार्श्वभूमी व अनुवांशिकता.

  2. जैवरासायनिक: मेंदू मधील काही सर्किट्स मध्ये होणारी serotonin या रसायनाच्या कार्यातली अनियमितता.

  3. वातावरण संबंधित: अचानक वाढलेला तणाव, मूळचा स्वभाव या गोष्टी.


OCD वर उपचार असतात का?

OCD हा मानसिक आजार असल्यामुळे त्यावरील उपचार इतर उपचारांपेक्षा वेगळे असतात. सर्वसाधारणत:


औषधोपचार:

तीव्र लक्षणे, दीर्घकाळचा आजार, झोपेवर झालेला परिणाम, नैराश्य या गोष्टी OCD सोबत असतील, तर औषधोपचार केले जातात. औषधोपचारा मध्ये बहुतांश वेळेस, selective serotonin reuptake inhibitors (SSRI) गटातील antidepressant औषधे वापरली जातात. ही औषधे बहुतेक प्रौढ वयोगटातील व्यक्तींसाठी सुरक्षित असतात व निगराणीखाली घेतल्यास प्रभावकारक ठरतात.

औषधोपचाराचा सर्वात मोठा फायदा:

  1. आजाराची लक्षणे पटकन नियंत्रणात यायला सुरुवात होते, झोप सुधारते

  2. आपण बरे होऊ शकतो हा विश्वास व्यक्तीच्या मनात निर्माण होतो,

  3. लक्षणे कमी झाल्यामुळे ती व्यक्ती या सर्व गोष्टी मुद्दाम करत नव्हती यावर कुटुंबियांचा विश्वास बसतो, व उपचारामध्ये ते जास्त संवेदनशीलतेने सहभागी होतात.

Cognitive Behaviour Therapy (CBT):

ही एक मानसोपचार पद्धती आहे, ज्यामध्ये, व्यक्तीला खालील गोष्टी टप्प्या-टप्याने शिकवल्या जातात:

  1. मनात येणार्या विचारांपैकी चुकीचे विचार बाजूला करणे.

  2. चुकीच्या विचारांना भावनिक आवरण न घालता, विवेकी पद्‍धतीने वेगळे करणे.

  3. विचार कितीही त्रासदायक असतील, तरी त्यांना सामोरे जाणे व ते आजाराचे विचार आहेत हे मेंदूला शिकवणे व स्वीकारण्याची सवय लावणे.

  4. विचार आल्यानंतर करायचे compulsion थांबवून त्याजागी दुसरी कृतीची सांगड घालणे.

या पायर्या वाचायला सोप्या वाटल्या तरी त्या शिकणे, व रोज वापरणे हे कठीण आहे. त्यामुळे, CBT ही पद्धत शक्यतो, सौम्य आजार असेल, व नैराश्य/निद्रानाश नसेल तर शक्यतो एकटी वापरली जाते.


साधारणत: जास्तीत जास्त सुधारणा होण्यासाठी, औषध व CBT या दोन्हींचा उपयोग करुन एकत्रित उपचार केले जातात.


CBT च्या वापराने, व्यक्ती केवळ OCD नव्हे, तर इतर अनेक मानसिक समस्या, व जीवनशैली विषयक अडचणींवर मात करु शकतो. OCD विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ही लिंक उघडून माहिती वाचू शकता.

इतर उपचार:

याखेरीज, OCD वर उपचार म्हणून, Exposure And Response Prevention (ERP), इतर मानसोपचार केले जातात, ज्यांचा वापर व उपयुक्तता मर्यादित आहे. OCD च्या अत्यंत चिवट किंवा वरीलपैकी कोणत्याही उपचारांना दाद न देणार्या लक्षणांवर Brain Stimulation, व शस्त्रक्रिया हे उपाय आहेत, मात्र त्यांचा वापर अत्यंत दुर्मिळ व मर्यादित आहे.

नातेवाईकांचा सहभाग

OCD च्या आजारापासून बरे होताना, नातेवाईकांचा सहभाग अत्यंत मोलाचा असतो:

  1. रुग्णाला आजारातून बरे होण्याचा विश्वास देणे.

  2. अधून मधून लक्षणांचा त्रास होत असताना सांभाळून घेणे.

  3. रुग्णाला अपराधी वाटणार नाही, मोकळे वाटेल याची काळजी घेणे.

  4. औषधे, पथ्य, व्यायाम, CBT मधील अभ्यास हे सर्व रुग्ण व्यवस्थित करतो आहे की नाही यावर लक्ष ठेवणे.

  5. रुग्णाची प्रगती मानसोपचारतज्ञांना कळवणे, पुढील उपचारांची माहिती घेणे, निर्णय प्रक्रियेत सहभागी होणे.

जीवनशैलीतील बदल.

उपचार सुलभ व्हावेत, पटकन् फायदेशीर ठरावेत, यासाठी काही जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक ठरते.

  1. झोपेची काळजी: दररोज पुरेशी झोप ही आरोग्याच्या दृष्टीने गरजेची असते. झोप नीट व्हावी यासाठी मानसोपचारतज्ञांच्या सल्ल्याने योग्य ते बदल करणे.

  2. व्यायाम: व्यायाम व शारिरीक हालचाल यांमुळे शरीराचा फिटनेस वाढतो, चयापचयाचा दर वाढतो, औषधाचा काम करण्याचा वेग व कार्यक्षमता वाढते. मानसिक आरोग्य व आजार यासाठीचा व्यायाम कसा करावा यासाठीच्या या लिंक जरुर वाचा:

OCD हा एक जटिल मानसिक आजार आहे. योग्य वेळेस निदान, तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मानसोपचार, व कुटुंबीयांचा सहभाग यांच्या सहाय्याने तो बरा होऊ शकतो.

OCD चे गणित सुटू शकते.


मानसिक आजारांवरील व आरोग्यासंबंधी शंकांसाठी संपर्क:

Dhanvantari Nursing Home Neuropsychiatry Centre

331, E, Off Wilder Memorial Church, New Shahupuri.

Kolhapur. 416001. Maharashtra.

Ph: +91-9167577279.

74 views0 comments

Comments


bottom of page