top of page
Search

मानसिक आजार बरा होतो का?

  • Writer: Devavrat Harshe
    Devavrat Harshe
  • Apr 25, 2023
  • 7 min read

Updated: 13 hours ago

"कोणतीही आरोग्य विषयक समस्या घेऊन डॉक्टर ना भेटत असताना आपल्याला वाटत असतं, "मला बरं वाटेल का?" मग मानसिक आजार याला अपवाद कसे असतील? मानसिक आजार किंवा समस्या घेऊन येणारे लोक बहुतांश वेळेस घाबरलेले, दडपणाखाली असलेले, मनात शंका व नानाविध प्रश्न असणारे अशा अवस्थेत येतात, ज्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न किंवा अविश्वास असतो, तो म्हणजे, "मानसिक आजार बरे होऊ शकतात?" हे प्रश्न व हा अविश्वास असण्याची काही प्रमुख करणे खालीलप्रमाणे:





,मानसिक आजाराविषयी समाजातील जागरूकता .

लहानपणापासून शरीरीक आजार, जसे ताप, थंडी, मलेरिया, रक्तदाब, मधुमेह आपण आजूबाजूला बघितलेले असतात. त्यांच्या उपचाराची चर्चा ऐकलेली असते. इंसुलिन, बायपास, अपेंडिक्स हे शब्द वापरलेले असतात. मानसिक आजाराच्या बाबतीत मात्र गुप्तता पाळली जाते. अनेकदा, अगदी वडिलांना असलेला आजार त्यावरचे उपचार मुलगा वयात येऊन नोकरी करू लगेपर्यंत त्याच्या पासून लपवले जातात, हे करण्यात अनेकदा मुलाला अकारण त्रास होईल, त्याचा अभ्यासाचा वेळ जाईल ही भीती असतेच,पण पुष्कळ वेळेस 1) जास्त वेळ मानसिक आजारी व्यक्ती बरोबर घालवला, तर तो ही तसंच वागेल, 2) त्यालाही पुढे तसा त्रास होईल या प्रकारचे गैरसमज असतात. यामुळे, इतर आजाराच्या बाबतीत जितकी माहिती आपल्याला असते, तितकी मानसिक आजाराच्या बाबतीत नसते. या नियमाला अगदी इतर आजारवर काम करणारे डॉक्टर ही अपवाद नाहीत.


,मानसिक आरोग्यविषयी असलेली जागरूकता .

शरीर चपळ व तंदुरुस्त रहावे यसाठीचे नियम, व्यायाम आपल्याला अगदी शाळेपासून शिकवलेले असतात. टीव्ही, पेपर मधील जाहिराती, मधून चपळ,सुडौल शरीर व त्याचे महत्व आपल्या पर्यन्त पोचलेले असते. मात्र मन निरोगी राहण्यासाठी काय करावे हे आपल्याला माहिती नसते, किंबहुना निरोगी मन म्हणजे काय हा देखील एक न चर्चिला जाणार विषय आहे. त्यामुळे जर मुळात आरोग्य म्हणजे काय हेच आपल्याला माहिती नसेल, तर आजार कशाला म्हणतात, काय चूक, काय बरोबर हे ठरवणे अवघड होऊन बसते.


मानसिक आजाराबाबतचे सामाजिक प्रवाद

शारिरीक आजारांपेक्षा मानसिक आजारांची लक्षणे थोडीशी वेगळी असतात, ती वागण्यातून दिसतात. मानसिक आजारांचे मूळ "मन" म्हणजेच मेंदूचा पुढील भाग. त्यामुळे त्याचा परिणाम दिसताना तो वागणे, बोलणे, झोप, भूक, काम करण्याची क्षमता, उर्जा, आवड, तरतरीतपणा या व अशा अनेक प्रकारे जाणवत असतो. एरवी या सगळ्या गोष्टी बर्यापैकी आपल्या हातात असतात, त्यामुळे जेव्हा ही लक्षणे जाणवतात, तेव्हा व्यक्ती ते मुद्दाम करतेय असा समज इतरांचा होतो. जर मुद्दाम कुणी काही करत असेल, तर त्यावर डॉक्टर काय करणार या गैरसमजातून अनेकदा उपचाराला उशीर होतो. याखेरीज, अनेकदा, अंधश्रद्धा, सामजिक कलंक, संकोच यामुळे उपचारापेक्षा अपायकारक उपाय करण्याकडे बर्याचदा भर दिला जातो. पुष्कळदा, लग्न करुन द्या, मूल झालं की सुधारेल असे सल्ले देऊन मूळची समस्या वाढवली जाते.


मानसिक आजार: वस्तुस्थिती:

मानसिक आजार व समस्या या तीन मूळ प्रकारच्या असतात.

१) आजार (Disorder): यात गंभीर व सौम्य प्रकारचे मानसिक आजार येतात, जे मेंदू मधील जैवरासायनिक बदलांमुळे झालेले असतात. जसे, schizophrenia, bipolar disorder, OCD, dementia, anxiety, depression इ.

२) त्रास (Distress): अनेकदा व्यक्तीला मानसिक आजार नसतो, पण आजूबाजूची परि्स्थिती, वातावरण, घरातील समस्या, किंवा इतर कोणत्याही अडचणीमुळे व्यक्ती त्रासून गेलेली असते. जसे समजा एक गृहिणी आहे, परंतु घरात सुरु असणारी भांडणे, किंवा व्यसनी नातेवाईक यामुळे त्रासून गेली आहे, किंवा एखादा IT कंपनी मध्ये काम करणारा तरुण, त्रासदायक वरिष्ठ किंवा बॉस मुळे वैतागलेला आहे. या दोन्ही परिस्थिती मध्ये अडकणे म्हणजे काही आजार नव्हे, पण जोपर्यंत ती परिस्थिती निवळत नाही, किंवा, त्या परिस्थितीला तोंड देण्याची ताकद त्या व्यक्तीमध्ये येत नाही, तोपर्यंत त्याचा त्रास त्या व्यक्तीला होतच राहिल.

३) अडचणी (Dysfunction): अनेकदा, परिस्थिती अशी बनते, की म्हटलं तर त्यात सगळेच बरोबर असतात, पण प्रत्येकाच्या वागण्यामुळे ती जागा, तो ग्रुप, ती टीम, किंवा कुटुंब या जीवन अस्तव्यस्त होऊन जाते. उदा: समजा २ अतिशय विरुद्ध स्वभावाच्या मुलाचे आणि मुलीचे लग्न झाले, आणि त्यानंतर अगदी छोट्या छोट्या गोष्टीत त्यांचे मतभेद व्हायला सुरुवात होते. दोघांचेही मत बरोबर असू शकते, आणि दोघेही आपल्या जागी अगदी परफेक्ट असू शकतात, पण या वातावरणात कुटुंब पुढे जाऊ शकत नाही, शांततेत राहू शकत नाही.


मानसिक आजार व समस्या बरे होतात का?


याचेही उत्तर मी तुम्हाला २ भागामध्ये देईन.


१) पूर्ण बरे होऊ शकणारे आजार व समस्या:

सौम्य प्रकारचे मानसिक आजार, जसे सौम्य डिप्रेशन, अँक्साईटी (anxiety), panic attacks, निद्रानाश (insomnia) हे आजार पूर्ण बरे होऊ शकतात. पूर्ण बरे याचा अर्थ, आजार बरा होऊन, उपचार, औषधे थांबून ती व्यक्ती पुन्हा निरोगी आयुष्य जगू शकते. याशिवाय, परिस्थिती मुळे निर्माण होणारा त्रास, आणि अडचणी जर ती परिस्थिती निवळली, तर पूर्ण थांबतील, जसे मुलाला लागलेल्या व्यसनामुळे त्रासलेली आई, तिचा त्रास, मुलगा निर्व्यसनी झाल्यानंतर आपोआप थांबेल हे सांगायला नको. स्वभावातील फरकामुळे भांडणारे जोडपे, जर जोडीदाराचा स्वभाव स्मजून घेईल, तर शांत व आनंदी जीवन जगू शकतील. त्यांच्या मध्ये भांडणे होणार नाहीत, असे नाही, पण, स्वभाव स्वीकारल्यामुळे, ती भांडणे योग्य प्रमाणात कशी संपवायची हे ते शिकून घेऊ शकतील.


२) पूर्ण नियंत्रणात राहणारे आजार व समस्या:

काही प्रकारचे आजार हे दीर्घकालीन असतात, किंवा, चिवट झालेले असतात, किंवा, त्याचे फेरे पुन्हा पुन्हा येतात, जसे, schizophrenia हा आजार, किंवा बायपोलर डिसऑर्डर (bipolar disorder) हा आजार, पुन्हा पुन्हा येणारे, किंवा ठराविक ऋतू मध्ये येणारे डिप्रेशन (seasonal affective disorder, cyclical depression, recurrent depression), किंवा Obsessive Compulsive Disorder (OCD). या आजाराच्या एका फेऱ्यातून (episode) व्यक्ती पूर्ण बरा होऊ तर शकतो, मात्र, काही वेळेस, आजाराचा पल्ला इतका मोठा असतो, आजाराने झालेले नुकसान इतके जास्त असते, किंवा, आजार पुन्हा बळावला, तर खूप काही गमावायची भीती असते, अशा वेळेस, पूर्ण बरा होऊन देखिल, परिस्थिती नियंत्रणात राहावी, या करिता औषधे सुरु ठेवली जातात. या गटातील रुग्ण देखील, पूर्ण बरे असतात, निरोगी असतात, मात्र त्यांचा उपचार (औषधोपचार, किंवा मानसोपचार, जसे Cognitive Behaviour थेरपी (सीबीटी)) हे सुरु असतात. अनेकदा, औषधांचं प्रमाण, आणि संख्या हळूहळू कमी केली जाते. जर आजाराचा पहिला फेरा असेल, रुग्ण तरुण-मध्यमवयीन असेल, दुसरी मोठी आरोग्याची समस्या नसेल, तर औषधे कमी करून बंद करण्याची पूर्ण संधी रुग्णाला दिली पाहिजे हे संशोधनातून आलेल्या पुराव्याने सिद्ध झाले आहे व याबाबत मानसोपचार तज्ञांचे एकमत आहे.


याखेरीज, dementia, गंभीर स्वरूपातील schizophrenia किंवा delusional delusional (भ्रम आणि भास होणे) यासारखे आजार, अनेकदा, psychiatrist पर्यंत पोहोचताना फार उशीर झालेला असतो, आणि आजाराची लक्षणे, आजारामुळे झालेले मेंदूचे, मनाचे आणि माणसाच्या माणूसपणाचे इतके नुकसान झालेले असते, की अगदी औषधे सुरु असुन देखील आजार पूर्ण बरा राहत नाही, आजाराचा ठसा मागे दिसत राहतो. त्यामुळे औषध सुरू ठेवल्याने रुग्ण शांत आणि सुरक्षित राहतात, पूर्ण बरे होण्याची शक्यता कमी असते, मात्र, उपचार सुरू ठेवल्याने, आजाराचा मार्ग रोखला जातो, झालेले नुकसान भरून येऊ शकत नसेल, तरीदेखील पुढे होऊ शकणारे नुकसान थांबावे, किंवा त्याचा वेग मंद व्हावा यासाठी केली जाणारी ती उपाय योजना आहे.


मानसिक आजार/समस्या असणाऱ्या व्यक्तींनी घ्यायची काळजी.

१) तुम्हाला होणारा त्रास स्वतःशी लपवून ठेवू नका. तुमच्या जवळची, विश्वासाची, काळजीची जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे, तिच्यासोबत बोलून होणारा त्रास तिला सांगा. याने, तुमच्या मनावरचे ओझे थोडे कमी होईल, तसेच, ती व्यक्ती तुम्हाला परिस्थिती तून मार्ग काढण्यास मदत करू शकेल.


२) जर तुम्हाला किंवा जवळच्या व्यक्तीस मानसिक आजार असेल, किंवा आहे अशी शंका तुम्हाला असेल, तर सर्वप्रथम तुमच्या फॅमिली डॉक्टर यांच्याशी संपर्क साधा आणि दिसणारी लक्षणे मानसिक आजाराची आहेत का याची खात्री करा. तसे करायचे नसेल, तर जवळच्या मानसोपचार तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा. त्यासाठी, Google वर जाऊन "psychiatrist near me" असे, किंवा ज्या गावात तुम्ही राहता, त्या गावाचे नाव लिहून सर्च करा जसे, "psychiatrist in Kolhapur"


३) मानसिक आजाराचे निदान झाल्यास, उपचार, निदान, आजाराचा पल्ला आणि मार्ग यांची माहिती डॉक्टर यांच्याकडून व्यवस्थित घ्या. काही शंका असल्यास त्या मोकळेपणाने विचारा. डॉक्टरांनी दिलेला सल्ला तुम्हाला पटत नसेल, तर अगदी जरूर second opinion घ्या.


४) आजारासाठी सुरु केलेले उपचार, औषध, मानसोपचार, समुपदेशन, जीवनशैली मधील बदल, विद्युतोपचार असे जे काही असतील, ते थोडा फरक दिसू लागल्यावर ताबडतोब बंद करू नका. आजाराची लक्षणे जरी कमी झाली, तरी आजारातून रिकवर होण्यासाठी जो वेळ लागतो, निदान तेवढा जाईपर्यंत उपचाराची साथ असणे आवश्यक आहे. जसे, पाय फ्रैक्चर झाल्यानंतर प्लास्टर घातले जाते. पण ५-७ दिवसात पाय दुखायचं थांबतो, मात्र प्लास्टर लगेच काढले जात नाही. पाय दुखायचा जरी थांबला, तरी तो पूर्ण जुळलेला नसतो. तसेच मानसोपचाराचे आहे.


५) महत्त्वाचे: निदान झाल्यावर, उपचार सुरू असताना, recovery होत असताना, अचानक कोणताही महत्वाचा आयुष्यातील निर्णय, बदल घेत किंवा करत असताना, तुमच्या मानसोपचार तज्ञ डॉक्टर यांच्या सोबत चर्चा करुन घ्या. याची कारणे २: मानसिक त्रास होत असताना, घेतलेले अनेक निर्णय, हे नंतर चुकीचे ठरण्याची शक्यता असते, आणि, कोणताही मोठा बदल होत असताना, त्याचा मानसिक त्रास आपल्याला होतोच! त्यामुळे मूळचा त्रास वाढण्याची शक्यता असते. काही काही निर्णय असे असतात, की त्यांचा परिणाम आयुष्यासोबत उपचारावर देखील होतो, उदा: डिप्रेशन वर उपचार सुरु असताना, रिकवरी होत असतानाच, अचानक घेतलेला लग्न करण्याचा निर्णय. योग्य व्यक्तीसोबत लग्न होणे ही आनंदाची गोष्ट आहेच, मात्र, ते लग्न होत असताना, उपचार बंद होणे, जागरण झाल्याने लक्षणे वाढणे, त्याचा लग्नात त्रास होणे, आनंदावर विरजण पडणे हे तर होऊ शकतेच, याशिवाय, सुरू असणाऱ्या औषधांबाबत जोडीदाराला काय सांगायचे याचा विचार केला नसल्यास, नंतर अडचणी व गैरसमज निर्माण होऊ शकतात.


तर मित्रांनो, मानसिक आजार बरा होतो का, याचे हे उत्तर. तुम्हाला जर याविषयी अजून काही प्रश्न असतील, तर जरूर आम्हाला कळवा, आम्ही त्याचे उत्तर द्यायचा प्रयत्न करू.


Frequently Asked Questions (FAQ)


These questions are curetted from those that are asked during treatment sessions, and our expert psychiatrist will provide answers to them here.


प्रश्न: मानसिक आजार बरा होतो का?

उत्तर: होय. अनेक मानसिक आजार योग्य उपचार, समुपदेशन आणि वेळेवर हस्तक्षेप केल्यास पूर्णपणे नियंत्रणात येतात किंवा बरे होऊ शकतात.


प्रश्न: मानसिक आजार म्हणजे वेडेपणा असतो का?

उत्तर: नाही. मानसिक आजार हा वेडेपणा नसून तो मेंदूच्या कार्याशी संबंधित वैद्यकीय आजार आहे. योग्य उपचारांनी रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो.


प्रश्न: मानसिक आजारासाठी डॉक्टरांकडे कधी जावे?

उत्तर: लक्षणे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत असतील, दैनंदिन कामकाजात अडथळा येत असेल किंवा त्रास वाढत असेल तर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.


प्रश्न: मानसिक आजारासाठी समुपदेशन पुरेसे असते का?

उत्तर: काही सौम्य अवस्थांमध्ये समुपदेशन पुरेसे असू शकते. मात्र काही आजारांमध्ये औषधांसह समुपदेशन केल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात.


प्रश्न: मानसिक आजारांसाठी दिली जाणारी औषधे सवयीची होतात का?

उत्तर: बहुतांश मानसिक आजारांची औषधे सवयीची नसतात. औषधांची गरज, कालावधी आणि सुरक्षितता मानसोपचार तज्ज्ञ रुग्णाला स्पष्टपणे समजावून सांगतात.


प्रश्न: मानसिक आजाराचे उपचार गोपनीय ठेवले जातात का?

उत्तर: होय. सर्व उपचार, चर्चा आणि वैद्यकीय नोंदी पूर्णपणे गोपनीय ठेवल्या जातात व वैद्यकीय नीतीनुसारच हाताळल्या जातात.


प्रश्न: औषध बंद केल्यावर आजार परत येऊ शकतो का?

उत्तर: काही रुग्णांमध्ये औषध अचानक बंद केल्यास लक्षणे परत येऊ शकतात. त्यामुळे औषधे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि हळूहळू कमी करणे आवश्यक असते.


प्रश्न: मानसिक आजार असलेली व्यक्ती सामान्य आयुष्य जगू शकते का?

त्तर: होय. योग्य उपचार, कुटुंबाचा आधार आणि नियमित फॉलो-अप असल्यास बहुतेक रुग्ण शिक्षण, नोकरी, छंद, कला आणि आयुष्याचे इतर पैलू सांभाळत आणि कौटुंबिक आयुष्य नीट जगू शकतात.


प्रश्न: मानसिक आजारासाठी औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात का?

उत्तर: नाही. उपचारांचा कालावधी आजाराच्या स्वरूपावर आणि रुग्णाच्या प्रतिसादावर अवलंबून असतो. वर लिहिल्याप्रमाणे, काही आजारामध्ये औषधे पूर्ण बंद होऊ शकतात, काही मध्ये, केवळ maintainance पुरती सुरु राहतात. याबाबत अधिक माहिती करिता तुमच्या मानसोपचार तज्ञ डॉक्टर यांच्याशी संपर्क साधा.


प्रश्न: मानसिक आजारासाठी औषधे सुरू असताना मूल होऊ द्यावे का?

उत्तर: याचे उत्तर थोडेसे मोठे आहे. पोटात मूल असताना, खरे तर कोणतेच औषध घ्यायचे नसते. मात्र, जर मानसिक आजार खूप गंभीर असेल, किंवा, पूर्वी, मानसिक तणावामुळे pregnancy राहत नसेल, तर अशा वेळेस उपचार बंद करणे धोकादायक ठरते. अशा वेळेस, तुमचे मानसोपचारतज्ञ, आणि तुमचे स्त्रीरोग तज्ञ, एकत्र चर्चा करुन, उपचार, pregnancy आणि आई व बाळाची सुरक्षितता, यासाठी यशस्वी पणे मार्ग काढू शकतात.

FAQ's Curetted and Answered by:


Dr Devavrat Harshe

MBBS, MD PhD Psychiatry

Senior Psychiatrist an Specialist

Dhanvantari Nursing Home Neuropsychiatry Centre, Kolhapur


 
 
 

Comments


bottom of page